नवी दिल्ली: कोळसा कांडावरून सरकारवर विरोधकांची आगपाखड सुरू असताना समाजवादी पक्षाचा पाठिंबा हा सत्ताधारी आघाडीला मोठा आधार वाटत आहे. मात्र सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी कोळसाकांडाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी करून सत्ताधार्यांना धक्का दिला आहे.
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी गुरुवारीही संसदेचे कामकाज बंद पाडले. या पार्श्वभूमीवर संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सपाच्या वतीने शुक्रवारी धरणे धरण्यात येणार आहे. मात्र कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशीची मागणी मुलायमसिंग यांनीही केल्याने सत्ताधार्यांना घाम फुटला आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी मुलायमसिंग यांनी कम्युनिट पक्षाचे (माओवादी) नेते वसुदेव आचार्य, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गुरुदास दासगुप्ता आणि टीडीचे नामा नागेश्वर राव यांची भेट घेतली आहे.