एसएमएसवरील निर्बंध उठविले

नवी दिल्ली: अफवा पसरू नयेत यासाठी एसएमएस पाठविण्यावर घालण्यात आलेले निर्बंध रद्द करण्यात आले आहेत.

आसाममधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयाचा वापर करून देशभरात अफवा आणि द्वेषभावना पसरविल्या जात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आले. या अफवांच्या प्रसारामुळे भयभयीत होऊन देशाच्या विविध भागात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले ईशान्य भारतीय पुन्हा आपल्या राज्यात परतण्याचा ओघच सुरू झाला.

अफवांचा प्रसार टाळण्यासाठी मोबाईल फोनद्वारे बल्क एसएमएस पाठविण्यावर निर्बंध घालण्यात आले. सुरुवातीला दिवसातून केवळ ५ एसएमएस पाठविण्याचे बंधन घालण्यात आले. वातावरण निवळू लागताच हे निर्बंध थोडे सैल करून एसएमएसची संख्या २० पर्यंत वाढविण्यात आली. मात्र आता हे निर्बंध पूर्णपणे रद्द करण्यात आले असून मोबाईलधारक कितीही एसएमएस पाठवू शकणार आहेत.