विसाव्या शतकात भारताच्या रस्त्यावर प्रामुख्याने फियाट, मारूती ८०० आणि अॅबॅसिडर गाड्यांची हुकमत होती. मात्र आता हे चित्र वेगाने बदलत चालले असून जगभरातील वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांनी भारतात जी गुंतवणूक केली आहे त्यामुळे आगामी वर्षातच विविध कंपन्यांची तब्बल आठ नवी मॉडेल्स ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. कमी किंमत आणि जास्त मायलेजला पसंती देणारे भारतीय ग्राहक आता नव्या महागड्या गाड्यांनाही पसंती देऊ लागले असल्याचेही दिसून येत आहे. जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेली वाहन उद्योगाची बाजारपेठ म्हणून भारत ओळखला जात आहे.
निस्सानची डटसन अवघ्या चार लाखात भारतात उपलब्ध करून दिली जात आहे आणि किंमत कमी करण्यासाठी तिचे उत्पादनही येथेच केले जाणार आहे. २०१३ सालात ही गाडी मारूती अल्टो, वॅगन आर आणि ह्युंडाईच्या इऑनशी स्पर्धा करण्यास सज्ज होत आहे. क्रेसलर ग्रुप दोन वर्षांपूर्वीच विकत घेतलेल्या इटालियन फियाटने फियाट जीप बाजारात आणण्याची तयारी चालविली आहे. ग्रँड चकोरी व रँग्लर अशी दोन मॉडेल्स भारतात आणली जात आहेत मात्र त्यांच्या किमती अनुक्रमे २३ व ३५ लाखांवर आहेत. दक्षिण कोरियन किया मोटर्स या ह्यंडाईच्या सबसिडरी कंपनीने चार वर्षांपूर्वीच त्यांची किया कार भारतात आणायचा विचार केला होता मात्र त्यावेळी बाजार अनुकुल नसल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा एकदा बाजाराचा आढावा घेऊन किया पिसाटो भारतीय बाजारात येत आहे. त्याच्या टेस्ट ड्राईव्ह भारतीय रस्त्यांवर घेतल्या गेल्या आहेत.
जर्मन ब्रँड व्होक्सवॅगनने स्पेनच्या सीएट कंपनीशी केलेल्या सहकार्यातून तयार करण्यात आलेली सीएट ही अत्यंत आकर्षक कार भारतीयांना सुटेबल अशा विविध मॉडेल्समध्ये बाजारात येत आहे तर यापूर्वी फारसा चांगला प्रतिसाद न मिळूनही प्युजोट या फ्रेंच कार कंपनीने पुन्हा भारतात कमबॅक करायचा निर्णय घेतला आहे. हच बॅक आणि सेदानचे मिश्रण असलेली ही कार भारतात लवकरच येत असून त्यांचीच ३०१ नोचबॅकही भारतीय बाजारात उतरविली जात आहे.त्यांचा उत्पादन प्रकल्प साणंदमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही वृत्त आहे.
दक्षिण कोरियन सांगयाँग मोटर्सची सांगयोंग कार महिद्रा अॅन्ड महिद्राच्या सहकार्याने भारतात लाँच केली जात असन रेक्सटॉन डब्ल्यू एसयूव्ही व कोराडो प्रिमियम अशी दोन मॉडेल्स २०१२ च्या अखेरीस भारतात दाखल होत आहेत.