चंबळमधून डॉल्फिन्स हद्दपार होण्याचा धोका

ग्वाल्हेर: केवळ गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळणार्‍या गंगा डॉल्फिन्सची संख्या वेगाने घटत असून राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित करण्यात आलेल्या या प्राण्याच्या अस्तित्वाची चिंता वाहण्यास कोणीही तयार नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती उघड होत आहे.

गंगा डॉल्फिन गंगा आणि गंगेला मिळणार्‍या नद्यांमध्ये आढळतो. प्रामुख्याने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातून वाहणार्‍या चंबळ नदीतही यांची संख्या उल्लेखनीय आहे. भारतीय वन्यप्राणी संस्था आणि जागतिक वन्यप्राणी महासंघ यांनी वनाधिकार्‍यांच्या सहकार्याने मे आणि जून महिन्यात चंबळमधील गंगा डॉल्फिनची गणना केली. मागील सहा वर्षात या परिसरातील डॉल्फिन्सची संख्या सातत्याने घटत असल्याची बाब या गणनेत दिसून आली. सहा वर्षापूर्वी चंबळ नदीत १७५ डॉल्फिन्स होते तर या वर्षीच्या गणनेत केवळ ५८ डॉल्फिन्स शिल्लक राहिल्याचे निदर्शनास आले.

एकूण गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्येही डॉल्फिन्स कमी होत आहेत. सन १९८० मध्ये गंगा आणि उपनद्यांमध्ये ५ हजार डॉल्फिन्स होते. मात्र सध्या ही संख्या दीड हजारापर्यंत रोडावली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे वनक्षेत्रपाल डॉ. ऋषिकेश शर्मा यांनी वनविभागाला सदर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. या डॉल्फिन्सच्या सुरक्षेसाठी काही उपायही त्यांनी आपल्या अहवालात सुचविले आहेत.

चंबळच्या पत्रात वाळूसाठी होणारे उत्खनन आणि शिकार या कारणामुळे डॉल्फिन्सची संख्या कमी होत असून हे प्रमाण आणि परिस्थिती कायम राहिली तर चंबळमधून डॉल्फिन्स कायमचे हद्दपार होण्याची भीती आहे.