कर्नाटकात इंडियन मुजाहिद्दीनच्या ९ संशयितांना अटक

बंगलोर दि.३०- इशान्य भारतातील व प्रामुख्याने आसाम राज्यातील नागरिकांना धमकीचे व अफवा पसरविणारे मेसेज पाठवून या नागरिकांना स्वतःच्या राज्याकडे परतविण्यास कारणीभूत ठरलेल्या ९ जणांना कर्नाटक पोलिस आणि उत्तरप्रदेश विशेष कृती दल यांनी अटक केली असून त्यातील पाच जणांना हुबळी येथून तर चार जणांना बंगळूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व जण इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

आसाम आणि म्यानमार येथे मुस्लीमांवर होत असलेले अत्याचाराचे निमित्त करून देशाच्या अनेक राज्यात आसाम आणि ईशान्स भारतातून आलेले विद्यार्थी नोकरदार यांना धमक्यांचे मेसेज पाठविले जात होते तसेच तेथील परिस्थितीबद्ल अफवा पसरविल्या जात होत्या. यामुळे धास्तावलेल्या ईशान्य भारतीय नागरिकांनी आपापल्या राज्यात परतण्यास सुरवात केली होती. बंगलोर, पुणे व मुंबईतून प्रचंड प्रमाणावर हे लोक परतू लागले होते. त्यांना आलेले मेसेज तपासले गेले तेव्हा हे मुद्दाम कुणीतरी पाठवित असल्याचे पोलिसांना आढळले. संबंधित मोबाईल्सचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आणि त्यावरूनच वरील नऊ जणांना विविध ठिकाणी छापे टाकून अटक करण्यात आली. हे नऊ जण एकमेकांच्या सतत संपर्कात होतेच पण त्यांचे इंडियन मुजाहिद्दीनच्या अन्य सदस्यांशीही संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सांगण्यात आले.