लोकसभेतील खासदारांचे प्रगतीपुस्तक

नवी दिल्ली दि.३० –  भारताचे भावी पंतप्रधान म्हणून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे पाहिले जात असले तरी लोकसभेतील त्यांची कामगिरी फारशी प्रभावी नसल्याचे आणि ८५ दिवसांच्या कामकाजात ते केवळ २४ दिवसच उपस्थित असल्याचे रिप्रेझेंटेटिव्ह अॅट वर्क या नांवाने मास ऑफ अवेअरनेस या स्वंयसेवी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. मे ११ ते मे १२ या एक वर्षाच्या कालावधीसाठी हे सर्वक्षण करण्यात आले होते. चोवीस दिवसांपैकी केवळ एकदाच राहुल गांधी यांनी चर्चेत भाग घेतला तर एकही प्रश्न उपस्थित केला नाही असेही आढळले आहे. राहुल गांधीच्या माताजी सोनिया याही केवळ ३४ दिवस लोकसभेत उपस्थित होत्या मात्र आजारपणामुळे त्या अनेक दिवसांत भारतातच नव्हत्या.

कोणत्याही लफड्यात न अडकताही भाजपचा खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने केवळ १६ दिवस उपस्थिती लावली असली तरी या काळात त्याने तब्बल ९९ प्रश्न उपस्थित केले व तीन वादविवादात भाग घेतला आहे. जनता दल सेक्युलरचे एच डी.कुमार यांनीही १६ दिवस तर त्यांचे पिताजी व माजी पंतप्रधान देवेगौडा यांची उपस्थिती ६८ टक्के इतकी आहे. स्पेक्ट्रम घोटाळ्यातील मंत्री ए.राजा हे केवळ चारच दिवस उपस्थित होते कारण बराच काळ ते तुरुंगातच होते तर राष्ट्राकुल घोटाळ्यातील पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी तुरूंगात असूनही ३० दिवस उपस्थित होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यांनी ३१ दिवस उपस्थिती लावल्याचे या सर्वेक्षणात आढळले.

पूर्ण ८५ दिवस म्हणजे १०० टक्के उपस्थितीचा मान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी मिळविला असून या काळात त्यांनी ३० वादविवादात भाग घेतला आहे. काँग्रेसचे पी.एल.पुनिया, जे.पी.आगरवाल यांचीही १०० टक्के उपस्थिती आहे तर एआयएडीएमकेचे थंबीदुराई यांनीही एकही दिवस लोकसभा चुकविलेली नाही. या कामकाजाच्या काळात महागाई, कॅग अहवाल, कोळसा खाण गैरव्यवहार तसेच थेट परदेशी गुंतवणूक आणि लोकपाल या विषयांवर वादविवाद घडले असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment