जम्मूत दोन दहशतवादी तळ उध्वस्त

जम्मू: रामबन जिल्ह्यातील सारानिहालच्या जंगलात पोलीस आणि सैन्य दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत अतिरेक्यांचा अड्डा उध्वस्त करून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सैन्यदलाच्या साथीने सारानिहालच्या जंगलातील एका घरात दहशतवाद्यांनी लपण्यासाठी आणि शस्त्रसाठा करण्यासाठी बनविलेल्या एका गुप्त ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पिस्तूल, विविध प्रकारच्या बंदुका आणि रायफल्स, ग्रेनेड, ग्रेनेड लाँचर्स, मॅगझिन्स, स्फोटके, बॉम्ब बनविण्याची सामग्री आणि पाकीस्तानी चलनातील रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती कर्नल आर. के. पल्टा यांनी दिली.

अशाच प्रकारे रविवारी संध्याकाळी रियासी जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांनी कारवाई करून दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला. या कारवाईत ए. के. ४७ रायफल्स, त्याच्या गोळ्या, चीनी बनावटीचे बॉम्ब आणि डिटोनेटर अशी सामग्री हस्तगत केली.