दुष्काळाचा फेरा

मानवतेच्या इतिहासात अनेक दुष्काळ गाजलेले आहेत. विशेषतः मराठवाड्यामध्ये काही जुन्या दुष्काळांच्या आठवणी वारंवार सांगितल्या जात असतात. मराठवाड्या सह सर्व महाराष्ट्रमध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळचा दुष्काळ फार विनाशकारी ठरलेला होता. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयामध्ये आणि संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये त्या दुष्काळामुळे झालेल्या वाताहतीच्या अनेक हकीकती वाचायला मिळतात. मराठवाड्यात १९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी अतीशय भीषण दुष्काळ पडला होता, असेही उल्लेख आढळतात आणि आता हयात असलेल्या लोकांना आठवणारा दुष्काळ म्हणजे १९७२ चा.

दुष्काळाच्या अभ्यासातून असे दिसून आलेले आहे की, तसा दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. दर दहा वर्षांनी दोन छोटे दुष्काळ आणि एक मोठा दुष्काळ पडत असतात. परंतु यातले हे तिनही दुष्काळ सलग आले की मोठा परिणाम जाणवतो. १९७२ साली तीच स्थिती निर्माण झाली होती आणि आता सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. यावर्षीचे पावसाचे दुर्भिक्ष्य एवढे भीषण आहे की, माणसे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. पूर्वीही अशी स्थलांतरे झालेली आहेत. परंतु आताच्या स्थलांतराचे एक वैशिष्ट्य असे की, स्थलांतर अधिक फायदेशीर ठरत आहे. हे स्थलांतर प्रामुख्याने खेड्यातल्या मजुरांचे आहे आणि शहरांमध्ये अशा मजुरांची टंचाई जाणवत आहे. म्हणजे खेड्यातून स्थलांतर करून शहरांमध्ये येणार्‍या मजुरांचे स्वागतच होत आहे आणि त्यांना तिथे कामही मिळत आहे.

त्यामुळे स्थलांतराला गती आलेली आहे आणि खेडी ओस पडण्याची शक्यता व्यत्त* केली जात आहे. गेल्या २० वर्षांमध्ये हे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाले आहेच आणि त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांची चणचण जाणवत आहे. पण आता मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून खेड्यामध्ये मजूर नावाचा घटक जवळपास अस्तित्वात नाही असे चित्र निर्माण झाले आहे. या सगळ्या घटनांचा खेड्याच्या अर्थकारणावर, शेतीवर आणि सामाजिक स्थितीवर काही प्रमाणात बरा आणि बर्‍याच प्रमाणावर वाईट परिणाम झाला आहे आणि होत आहे. यावर्षीच्या दुष्काळाची परिस्थिती केवळ महाराष्ट्रत आणि भारतातच आहे असे नाही तर आफ्रिका खंडाचा मोठा भाग आणि जगातील सर्वात श्रीमंत राष्ट* म्हणवणार्‍या अमेरिकेचा २५ टक्के हिस्सा दुष्काळाच्या छायेत आहे. अमेरिकेत तर दुष्काळ नावाची गोष्टच कधी जाणवत नव्हती. पण यंदा या कुबेर नगरीवर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. अमेरिकेत असे सांगितले जात आहे की, पावसाच्या बाबतीत बारा महिन्याची सरासरी सर्वात कमी असण्याची ही वेळ आहे.

१८९५ साली अशी वेळ एकदा आली होती. त्यानंतर ती आताच येत आहे. अमेरिकेमध्ये असा दुष्काळ पडला आणि अमेरिकेबरोबरच भारताच्याही अन्नावर जगणार्‍या आफ्रिकन देशातही दुष्काळ पडला की, तो दुष्काळ जागतिक अर्थकारणाला धक्के देत असतो. कारण या स्थितीत जागतिक स्तरावर धान्याच्या किमती प्रचंड वाढत असतात. म्हणूनच जागतिक हवामान संघटनेने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देताना, जगावर कोसळलेले हे अवर्षणाचे संकट केवळ शेतीपुरते मर्यादित नाही तर ते शेती, पाणी आणि ऊर्जा या तीन घटकांना व्यापणारे असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत परिस्थिती फारच गंभीर आहे. पण आपले केंद्रातले आणि राज्यातले सरकार या गांभीर्याची दखल घेत नाही. दुष्काळ पडून तीन महिने झाले. गतवर्षीच्या दुष्काळातून अजूनही राज्य सावरलेले नाही. तरीही महाराष्ट्रच्या सरकारला दुष्काळ जाहीर करायला तीन महिने लागले. काल दुष्काळ जाहीर झाला आहे.

राज्यातले १२३ तालुके दुष्काळी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे आणि आता या तालुक्यांना दुष्काळामुळे मिळणार्‍या सवलती मिळणार आहेत. केंद्र सरकारने या दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रला ३ हजार ६०० कोटी रुपये द्यावेत, अशी महाराष्ट्रची मागणी आहे. परंतु केंद्र सरकार याबाबतीत फार काही मदत करण्याच्या मनःस्थितीत नाही. अशी मदत करण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारची एक वरिष्ठ समिती आहे. या समितीत महाराष्ट्रचे दोन मंत्री असून सुद्धा महाराष्ट्रला मदत मिळत नाही. कदाचित थोडीबहुत मदत मिळालीच तर त्या मदतीतून सुरू होणारी कामे डिसेंबरच्या मध्याला सुरू होतील, असा अंदाज आहे. दुष्काळ निवारण्याच्या बाबतीत आपली काय अवस्था आहे याचे हे चित्र किती भीषण आहे हे यावरून लक्षात येते. दुष्काळ ही ग्रामीण भागात निव्वळ शेतीवर जगणार्‍या लोकांसाठी फार मोठी संकटाची वेळ असते. खरे तर निव्वळ शेतीवर जगणार्‍या लोकांचे जीवन दुष्काळ नसतानाही हलाखीचेच असते. दुष्काळात त्यात भर पडते. या परिस्थितीमध्ये शासनाकडून लोकांच्या खूप अपेक्षा असतात. परंतु शासनाच्या पातळीवर प्रचंड घोळ, गोंधळ, अनास्था, उदासीनता आणि राजकारण चाललेले असते. जनता मात्र भरडून निघते.

Leave a Comment