राफेलच्या खरेदीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली: फ्रान्सकडून राफेल या लढाऊ विमानांची खरेदी करण्यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या त्रयस्थ तज्ञ समितीने हिरवा कंदील दिला असून या आर्थिक वर्षात १२६ राफेल विमाने खरेदी केली जातील; अशी माहिती संरक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

केंद्राने फ्रान्सकडून राफेल विमानांच्या खरेदीचा करार करण्यासंबंधी प्रस्ताव मांडल्यावर तेलगु देसमचे तत्कालीन खासदार म्हैसुरा रेड्डी यांच्यासह अनेकांनी राफेलच का; असा सवाल केला होता. या प्रश्नी निष्पक्ष मार्गदर्शन मिळविण्यासाठी सरकारने त्रयस्थ तज्ञ समितीची नियुक्ती केली होती. या समितीचा अहवाल संरक्षण मंत्रालयाला प्राप्त झाला असून राफेलच्या खरेदीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

लवकरच फ्रान्स सरकारशी बोलणी करून विमान खरेदीचा करार पूर्णत्वास नेला जाईल; असे सूत्रांनी सांगितले.