नवी दिल्ली: कोळसा खाण घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ विविध नेत्यांच्या निवासस्थानी घेराव घालण्यासाठी टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांना काबूत आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार, पाण्याचे फवारे आणि अश्रुधूर याचा वापर करावा लागला. विशेषतः या आंदोलनात महिलांची संख्या मोठी असल्याने अनेकदा पोलिसांना हतबल व्हावे लागले.
कोळसा खाणवाटप घोटाळा भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसने हातमिळवणी करून केल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी पंतप्रधान आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. वास्तविक पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारून जंतर मंतर येथे धरणे धरण्यास परवानगी दिली होती. मात्र केजरीवाल, मनीष सिसोदिया हे आपल्या काही सहकार्यांसह सकाळी साडे सहा वाजताच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जमले आणि त्यांनी धरणे धरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कुमार विश्वास आणि कार्यकर्ते सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर जमले. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणले. मात्र काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी आंदोलकांना अरेरावीची वागणूक दिली आणि मारहाणही केली; असा आरोप केजरीवाल यांनी सुटकेनंतर केला. सुटका झाल्यावर कार्यकर्ते जंतर मंतर येथे एकत्र जमले. या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्ते पुन्हा वेगवेगळ्या गटात विभागून काँग्रेस कार्यालय, संसद भवन, पंतप्रधानांचे आणि गडकरी यांचे निवासस्थान या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांनी आक्रमक रुप धारण केले. जनपथ आणि अकबर मार्ग येथे पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेट्स ओलांडून अथवा पाडून त्या पार करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी या जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार, अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे अशा सर्व मार्गांचा अवलंब केला.
पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील झटापट दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत सुरू होती. अखेर तीन वाजता केजरीवाल आंदोलकांना उद्देशून म्हणाले की; सरकारचे काळे कारनामे उघड करणे आणि भारतीय जनता पक्षाची काँग्रेसबरोबर असलेली हातमिळवणी जनतेसमोर आणणे हे आपले दोन्ही उद्देश सफल झाले आहेत. त्यामुळे आता निदर्शने थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.