चीनच्या शस्त्रसज्जतेबाबत अमेरिकेला चिंता

वॉशिंग्टन: चीनने आर्थिक क्षेत्राबरोबरच सामरिक सिद्धतेतही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला आव्हान उभे करण्याचे धोरण कायम ठवले आहे. चीनपासून थेट अमेरिकेपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे डॉगफॉग- ४१ हे आंतरखंडीय अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

तब्बल १४ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून या क्षेपणास्त्रातून एकावेळी १० अण्वस्त्रांचा प्रहार करणे शक्य आहे. पाण्याखालून पाणबुडीतूनही हे क्षेपणास्त्र डागणे शक्य आहे. अत्याधुनिक मोबाईल लाँचिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे क्षेपणास्त्र लक्ष्याच्या दिशेने झेपावत असताना किंवा त्यापूर्वी शोधून त्याचा वेध घेणे अत्यंत कठीण असल्याचे अमेरिकन गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला सदर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चीनच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्जतेबाबत अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये चिंतेचे वातावरण असून विशेषत: अमेरिका चीनच्या शस्त्रसज्जतेवर बारकाईने नजर ठेऊन आहे. सध्या चीनकडे ५५ ते ६० अण्वस्त्रधारी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून एका पाणबुडीत १० ते १२ क्षेपणास्त्र तैनात करण्याचे चीनचे नियोजन आहे आणि या माध्यमातून चीन अमेरिकन क्षेपणास्त्रांचे सुरक्षाकवच भेदण्याचा प्रयत्न करू शकेल; असा इशारा
गुप्तचर विभागांनी दिला आहे.