कृषी पदविका अभ्यासक्रम

eduकृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती व्यवसाय तंत्रज्ञानाच्या अंगाने केला तर तो फायदेशीर ठरू शकतो याची जाणीव होत आहे. परंतु शेतीचे तंत्रज्ञान सर्वांनाच माहीत नसते आणि शेतकरीवर्ग आपल्याला माहीत असलेल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारे जमेल तशी शेती करत असतात.

शेतीला जोडधंद्याची जोड दिली आणि तो व्यवसाय नीट केला तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे आता सर्वांनाच जाणवत आहे. त्यामुळे मोठे आणि मध्यम शेतकरी अकुशल शेतमजुरांना शेतात नोकरी देण्याऐवजी असे तांत्रिक ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्राधान्य देत आहेत. शेतमजुरांची चणचण भासत असल्यामुळे त्यांच्या पगारीही भरपूर झालेल्या आहेत. म्हणजे कृषी शास्त्रामध्ये बारावीनंतरची पदविका मिळवून अनेक जणांना अशा नोकर्‍या मिळणे शक्य झाले आहे.

फळबागायती करणारे अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेती शास्त्रातील पदवी आणि पदविकाधारकांना नोकरी देण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी पदविका अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. कर्नाटकात सुद्धा अॅग्रीकल्चर अॅन्ड व्हेटर्नरी युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने राज्याच्या विविध भागांमध्ये दोन किवा तीन वर्षांचे कृषी पदविका अभ्यासक्रम असलेली तंत्रनिकेतने सुरू केली आहेत. या तंत्रनिकेतनामध्ये आणि महाराष्ट*ातल्या कृषी पदविका विद्यालयांमध्ये शेती, फळबागायती, कुक्कुट पालन, दुग्धव्यवसाय, रोपवाटिका व्यवस्थापन, जल व्यवस्थापन अशा अनेक विषयांचे तांत्रिक ज्ञान दिले जात आहे.

दहावी, बारावी करून डी.एड. होऊन शिक्षक होण्याचे वेड आता जुने झाले आहे आणि अशा प्रकारे डी.एड. करून पश्चात्ताप पावलेले लाखो पदविका-धारक गावागावांमध्ये निराश अवस्थेत जीवन जगत आहेत. त्या डी.एड.पेक्षा हा कृषी पदविकेचा अभ्यासक्रम अधिक उपयुत्त* आणि बर्‍यापैकी नोकरी देणारा ठरत आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. स्वतःची शेती असणार्‍या सर्वांनाच बी.एस्सी. अॅग्रीचा अभ्यासक्रम करता येईलच असे नाही. अशा लोकांनी असे पदविका अभ्यासक्रम करायला काही हरकत नाही.

Leave a Comment