पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर: संपूर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची ओडिशा येथील सुरक्षा तळावर शनिवारी घेण्यात आलेली चाचणी १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा चण्डीपूरच्या चाचणी तळाचे संचालक एम.व्ही.के. प्रसाद यांनी केला.

पृथ्वी-२ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र हे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत विकसित केल्या जाणार्‍या पाच क्षेपणास्त्रांपैकी पहिले क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र ३५० किलोमीटरवर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. एका वेळी ५०० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.