इंग्लंडच्या धमकीला इक्वेडोरचे प्रत्युत्तर

लंडन: इंग्लंडने आमच्या दूतावासात घुसून विकीलीक्सचा संस्थापक ज्युलिअन असांजे याला अटक करण्याचा प्रयत्न केला तर जगभरातील लोकशाहीवादी कार्यकर्ते ब्रिटनच्या ठिकठिकाणच्या दूतावासात घुसल्याशिवाय राहणार नाहीत; असा इशारा इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष राफेल कोरेया यांनी दिला.

असांजे याला राजनैतिक आश्रय देण्याची घोषणा इक्वेडोरने केली असून असांजे सध्या इक्वेडोरच्या लंडन दूतावासात आहे. मात्र इक्वेडोरच्या या भूमिकेबद्दल ब्रिटनने तीव्र नाराजी व्यक्त करून; इक्वेडोरच्या दूतावासात घुसून आम्ही असांजेला अटक करू; पण त्याला लंडनच्या बाहेर जाऊ देणार नाही; अशी धमकी दिली होती. या धमकवणीचा खरपूस समाचार कोरेया यांनी घेतला.

असांजे याच्यावर स्वीडन येथे लैंगिक अत्याचाराचा आरोप असून अमेरिकाही त्यांची गुपिते वेशीवर टांगल्याबद्दल असांजेवर संतप्त आहे.

मात्र असांजेच्या समर्थकांची संख्याही मोठी असून त्याला समर्थन देणार्या हॅकर्सच्या एका गटाने सरकारचा निषेध करण्यासाठी ब्रिटीश पंतप्रधान कार्यालय, गृह आणि न्याय मंत्र्यालयाच्या वेबसाईट्स सोमवारी रात्री हॅक केल्या.