न्यूयॉर्कमध्ये बनारसी पान लोकप्रिय, पण…!

न्यूयॉर्क,२२ ऑगस्ट-भारताच्या पानाने न्यूयॉर्कमधील लोकांनाही वेड लावले आहे. त्यामुळे तेथील पानाच्या ठेल्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. परंतु पानाची पिंक मारल्याने होणारी घाण ही तेथील स्वच्छता प्रशासनाची डोकेदूखी झाली आहे.

न्यूयॉर्क शहरात दक्षिण आशियातून आलेले बरेच नागरिक स्थायिक झाले आहेत. शहराच्या जॅकसन हाईटस भागात या लोकांची संख्याही जास्त आहे. तेथे एक बाजारदेखील आहे ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लांदेश आणि नेपाळ येथील वस्तू विकण्यासाठी असतात. या बाजारातच नाक्यानाक्यावर पानाचे ठेले आहेत. हे पानाचे ठेले या बाजाराचे खास आकर्षण ठरत आहेत. दिवसेंदिवस या ठेल्यांची लोकप्रियताही वाढत आहे.

पान खाण्याची मजा काही औरच असे म्हणत अनेक पानशौकीन लोक येथे येतात. भारताच्या हैदराबादमधून न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झालेले समद सूफी यांनी काहिशा अशा शब्दात आपले पान प्रेम व्यत्त* केले.’खाने के बाद एक मीठा पान मुंह में दबा लीजिए, एयरकंडीशन चलता रहे, सामने टीवी हो, साथ में बीवी बच्चे बैठे हों, हाथ में अखबार हो, तो एक सुरूर महसूस होता है.’ याशिवाय आपण पानाच्या पिंकेसाठी प्लास्टिकचे एक भांडे आपल्याबरोबर ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जॅक्सन हाईटस या भागातील इतर नागरिक मात्र पिंक टाकण्यासाठी एवढी काळजी घेत नाही. त्यामुळे पानाच्या पिंक टाकण्याने घाण होते. त्यासाठी काही पान ठेलेदारांना दंड देखील भरावा लागतो. महिन्याला ६० डॉलर इतका दंड भरत असल्याची माहिती तेथाल एका पान ठेल्याचे मालक गोवर्धन पटेल यांनी दिली. इतर लोक पान खाऊन थुंकतात आणि पान ठेलेदारांना त्याबद्दल दंड भरावा लागत असल्याची या ठेलेदारांची तक्रार आहे.

जॅक्सन हाईटस या भागात खरेदीकरण्यासाठी अमेरिकेच्या सर्व प्रांतातून विविध लोक येत असतात. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.