अल्पवयीन मुलाने घेतला दलबीरसिंग यांचा बळी

विस्कन्सिन: गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यापाठोपाठ या गुरुद्वाराचे ज्येष्ठ सदस्य दलबीरसिंग यांची गोळीबार करून हत्या करण्यात एका अल्पवयीन मुलाचा हात असल्याचे उघड झाले आहे. दलबीरसिंग यांच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाच्याने छायाचित्रावरून या १६ वर्षीय हल्लेखोराला ओळखले आहे.

विस्कन्सिन येथे गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याला १५ दिवस होतात तोच याच शहरात बुधवारी रात्री लूटमार करण्याच्या उद्देशाने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गुरुद्वाराचे ज्येष्ठ सदस्य दलबीरसिंग यांचा मृत्यू झाला. विल्यम्स या मुलाने केलेल्या गोळीबारात ते मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दलबीरसिंग आणि त्यांचा भाचा जतिंदर हे हार्मनी फूड्स हे आपले दुकान बंद करून बाहेर पडले असता लुटारूंच्या जमावाने त्यांना घेरले. त्यांनी लुटारुंच्या तावडीतून सुटून परत आपल्या दुकानात जाण्याचा प्रयत्न केला असता विल्यम्सने केलेल्या गोळीबारात दलबीरसिंग मरण पावले.

याच शहरात दि. ५ ऑगस्टला गुरुद्वारावर झालेला हल्ला आणि त्यानंतर बुधवारी झालेल्या गोळीबारात दलबीरसिंग यांचा मृत्यू यामुळे या ठिकाणाचा शीख समाज तणावग्रस्त आहे.