टंचाई परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या अथवा आवश्यक असलेल्या मदत कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणार्‍या कामात बदल करण्याबाबत केंद्राला प्रस्ताव देण्यासाठी एका मंत्रिगटाची नियुक्तीही या बैठकीत करण्यात आली.

राज्याच्या १५ जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टँकरद्वारे पाणी पुरवठा, आवश्यक तिथे जनावरांच्या छावण्या उभारणे; याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

केंद्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात भौगोलिक परिस्थितीनुसार कामाचे स्वरूप बदलण्याबाबत केंद्राला प्रस्ताव देण्यासाठी वने व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची नियुक्तीही या बैठकीत करण्यात आली.

Leave a Comment