लंडन दि.१७ – इक्वेडोरच्या दूतावासात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ आश्रय घेतलेल्या विकिलिक्स संस्थापक ज्युलियन असांजेला इक्वेडोरमध्ये राजकीय आश्रय देण्यास अध्यक्ष राफेल यांनी परवानगी दिली असली तरी असांजेला सहजासहजी ब्रिटनबाहेर पडू दिले जाणार नाही असे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव विल्यम हेग यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय आश्रय देण्याच्या इक्वेडोरच्या अध्यक्षांच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेग यांनी पत्रकारांशी बोलताना असांजेचे स्वीडनला हस्तांतरण करावयाची जबाबदारी ब्रिटनवर आहे व त्यासाठी आम्ही अखरेपर्यंत सर्व ते प्रयत्न करू असे सांगितले. ते म्हणाले की स्वीडन सरकारला ज्युलियन बलात्कार प्रकरणात हवा आहे. त्याच्या संस्थेने म्हणजे विकिलिक्सने केलेले गौप्यस्फोट आणि अमेरिकेची त्याबाबतची भूमिका याला आमच्यादृष्टीने महत्त्व नाही. स्वीडनला तो हवा आहे आणि म्हणूनच त्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. डिप्लोमॅटिक असायलम आम्हाला मान्य नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही असांजेला पकडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
इक्वेडोरचे परराष्ट्र मंत्री रिकार्डो पटीनो यांनी मात्र असांजेच्या राजकीय आश्रयाचे समर्थन केले आहे. असांजेला स्वीडनमधून अमेरिकेत पाठविले जाण्याची आणि तेथे मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची जी काळजी वाटते त्यावर आमचा विश्वास बसला आहे असे ते म्हणाले.