उत्तर प्रदेशातही हिंसाचार

लखनौ: आसाम आणि म्यानमार या ठिकाणच्या हिंसाचाराच्या विरोधात उत्तर प्रदेशात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक स्वरूप प्राप्त होण्याचे प्रकार राजधानी लखनौ आणि कानपूर येथे घडले.

लखनौ येथे रमजान महिन्यातील शेवटची ‘अलविदा नमाज’ अदा झाल्यानंतर सुमारे २ हजार जणांचा सहभाग असलेला मोर्चा आसाम आणि म्यानमार मधील हिंसाचाराच्या विरोधात घोषणा देत विधानभवनाकडे निघाला. वाटेतील बुद्ध उद्यानातील पुतळे जमावाने तोडले आणि उद्यानातील झाडेही उपटून टाकली.

विधानभवनकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बळाचा वापर करून रोखले. मात्र मोर्चातील हिंसक जमावाने आपला मोर्चा विधानभवनाजवळ उभ्या असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या ओ.बी. व्हॅन्स, छायाचित्रकार आणि प्रतिनिधींकडे वळविला. व्हॅन आणि कॅमेर्‍यांची जमावाने मोडतोड केली.

मोर्चा निघून गेल्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याच जागी ठिय्या दिला आणि गृहसचिव जोपर्यंत कडक कारवाईचे आदेश देत नाहीत तोपर्यत न हलण्याचा इशारा दिला.

कानपूर येथे प्रतीबाधात्मक उपाय म्हणून नमाजाच्या जागी शीघ्र कृती दल तैनात केले असूनही जमावाने तुफान दगडफेक केली.