भारतीय महिलांमुळे इकॉनॉमिक मोबिलीटीला चालना

मुंबई दि.१७- इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो या संस्थेने भारतीय महिलांच्या उत्पन्नातील वाढीबाबत केलेल्या सर्वेक्षणात भारतीय महिलांची कमाई गेल्या दहा वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढली असल्याचे समोर आले आहे. शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे आणि विशेष म्हणजे नोकरी व्यवसायामुळे महिला घराबाहेर अधिक काळ राहात असल्या तरी त्यामुळे घराचे नुकसान होत नाही तर घराची प्रगतीच होत असल्याचेही या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरातील २५ वर्षांवरच्या सुमारे ९ हजार महिलांची या सर्वेक्षणासाठी मुलाखत घेण्यात आली. तेव्हा असे आढळले की २००१ सालात शहरी भागात महिलांचे सरासरी उत्पन्न ४४९२ रूपये होते ते २०११ सालात ९५०० रूपयांवर गेले आहे. केवळ मेट्रो शहरातच नाही तर दुसर्‍या दर्जाच्या आणि तिसर्‍या दर्जाच्या शहरातील महिलांच्या उत्पन्नातही वाढ दिसून आली आहे.

महिलांचे शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्यामुळे विविध क्षेत्रात महिला नोकरी व्यवसाय करत आहेत. महिलांच्या उत्पन्नातील वाढीमुळे दरमहिना घरात येणार्‍या पैशांचे प्रमाणही वाढले आहे. अर्थात याचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती महिलामध्ये वाढीस लागली असून अनेक महिला परंपरेने कराव्या लागणार्‍या घरकामातून अंग काढून घेत असल्याचेही समोर आले आहे. मात्र त्याचा फायदा असाही झाला आहे की घरकाम करणार्‍या मोलकरणींचे उत्पन्नही त्यामुळे वाढले आहे.

महिलांच्या या प्रगतीचा फायदा अनेक क्षेत्रातील व्यावसायिक उद्योगांनाही होत असून महिलांची वाढलेली क्रयशक्ती, मिळविलेला पैसा खर्च करण्याचे बर्‍यापैकी असलेले स्वातंत्र्य लक्षात घेऊन आणि महिलांचा नैसर्गिक ओढा असलेल्या फॅशन्स, कपडे, अॅक्सेसरीज, दैनंदिन वापरातील वस्तू, कॉस्मेटिकस क्षेत्रातील कंपन्यांनी विविध आकर्षक पर्याय महिलावर्गासाठी उपलब्ध करून दिले आहेत. आणि महिलाही या सर्व उपभोग्य वस्तूंची खरेदी करत आहेत. २००१ सालात २२ टक्के असलेली फॅशन इंडस्ट्रीही या दहा वर्षात तब्बल ५५ टक्कयांवर गेली आहे.
 
महिलांच्या या प्रगतीचा फायदा बँकींग क्षेत्रालाही झाला आहे. आजकाल कमावत्या सर्वांचेच पगार बँकेत जमा होत असल्यामुळे गेल्या दहा वर्षात महिलांच्या बँकखात्यांची संख्याही ३३ टक्कयांनी वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ चार टक्के महिलांकडे क्रेडीट कार्ड होते ती संख्या आता १५० टक्कयांनी वाढली आहे. मात्र धक्कादायक निरीक्षण असेही आहे की बचतीकडे दुर्लक्ष करणार्‍या महिलांची संख्याही तुलनेने वाढत  चालली आहे.