मुंबई: डान्स परफॉर्मन्सच्या नावाखाली तरुणींना दुबईत नेऊन त्यांना देहविक्रयाच्या व्यवसायात ओढणार्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला असून अशा प्रकारे दुबईला नेण्यात येत असलेल्या ३६ तरुणींची पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून सुटका केली. या रॅकेटचे सूत्रधार मात्र अद्याप हाती लागलेले नाहीत.
नृत्य कार्यक्रमाच्या नावाखाली मुंबई, ठाण्यासह देशाच्या विविध भागातून तरुणींना दुबईला नेऊन देहविक्रयाच्या व्यवसायाला लावले जात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मात्र सबळ पुरावा आणि नेमकी माहिती हाताशी नसल्याने याबाबत ठोस कारवाई करता येत नव्हती.
दरम्यान; अशाच प्रकारे फसलेल्या एका तरुणीने अशा रॅकेटची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला दिली. दिल्लीच्या विमानतळावरून काही जणींना दुबईला पाठविण्यात येणार असल्याचेही तिने सांगितले. या माहितीनुसार समाजसेवा शाखेचे सहाय्यक आयुक्त वसंत ढोबळे यांचे पथक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी ३६ तरुणींची सुटका केली.
या रॅकेटच्या सूत्रधारांना लवकरंच गजाआड करण्यात पोलिसांना यश येईल; असा विश्वास समाजसेवा शाखेचे उपायुक्त बी. जी. शेखर यांनी व्यक्त केला. अशा प्रकारे फसवणुकीने दुबईला नेल्या जाणार्या तरुणीत प्रामुख्याने मुंबई, ठाण्यातील बारबाला आणि बॉलीवूड्मध्ये कारकिर्द घडविण्यासाठी आलेल्यांचा समावेश असून काही जणी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील आहेत.