वीज पोहोचली नाही तर मते मागणार नाही-नितीशकुमार

पटना दि.१६ – बिहारच्या हजारो खेड्यातील लक्षावधी नागरिक वीजेपासून वंचित आहेत.२०१५ पर्यंत या सर्व गावांना वीज देता आली नाही तर २०१५ ला होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षासाठी मते द्या असे सांगणार नाही असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात सांगितले.

नितीशकुमार म्हणाले ,आमच्या सरकारचे मुख्य ध्येय राज्याच्या कानाकोपर्‍यात वीज देणे हेच आहे. मात्र २०१५ पर्यंत राज्यभर वीज पुरविण्यात आम्ही अपयशी ठरलेा तर निवडणुकीत मते मागणार नाही. सत्तेवर आल्यापासूनच वीज परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी सातत्याने गंभीरपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटण्याजवळ बरथ येथे उभारण्यात येत असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर प्रकल्पातून राज्याचा वाटा मागण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील अन्य वीज निर्मिती प्रकल्पांनाही प्राधान्याने परवानग्या दिल्या जात आहेत.

वीज विभागातील अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहारची दररोजची वीजेची गरज २५०० ते ३००० मेगावॉट इतकी असून बिहारमध्ये होणारी वीजनिर्मिती केवळ १०० मेगावॉट इतकीच आहे. केंद्राकडून ११०० ते १२०० मेगावॉट वीज घेतली जाते मात्र तरीही वीजेची टंचाई कायम राहते.