अमित देशमुख यांचा मंत्रीमंडळ समावेश निश्चित

मुंबई दि.१६- विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आमदार अमित देखमुख यांचा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील समावेश नक्की मानला जात असून राज्याचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रीमंडळाचा जो फेरबदल होणार आहे त्यावेळी अमित यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल असे काँग्रेसच्या वरीष्ठ गोटातील नेत्यांकडून समजते.
 
छत्तीस वर्षीय अमित देशमुख यांना मंत्रीपद म्हणजे एकप्रकारे विलासरावांना मानवंदनाच असेल असे सांगताना हे नेते म्हणाले की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांची विलासरावांशी जवळीक होती. विलासरावांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला सोनिया उपस्थित होत्या. त्यामुळे अमित यांच्या मंत्रीमंडळातील समावेशात कांही अडचण दिसत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सोनिया आणि मनमोहनसिंग यांच्याकडे महाराष्ट्रातील जी तीन मंत्रीपदे रिकामी आहेत ती काँग्रेसमधूनच भरली जाण्याची गरज व्यक्त केली आहे.तसेच सध्याच्या मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांच्या जागी दुसर्‍यांची निवड होण्याची दाट शक्यताही आहेच.

अन्य एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत झालेल्या फेरबदलांनंतर मंत्रीमंडळात फेरबदल अपेक्षितच आहे. तर राजकीय निरीक्षकांच्या मते देशमुख कुटुंबियांचे मराठवाड्यात विशेषतः लातूर जिल्हयात असलेले वर्चस्व पाहता अमित देशमुखांचा समावेश मंत्रीमंडळात होणे योग्य ठरणार आहे. अमित गेली पंधरा वर्षे राजकारणात असून गेले दशकभर वडिलांच्या प्रचारमोहिमांची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. गेल्या निवडणुकीत प्रंचड मतांनी विजयी होऊन त्यांनी स्वतःची क्षमताही सिद्ध केली आहे.

राजकीय क्षेत्रात अमितभैया नावाने परिचित असलेल्या अमित देशमुख यांना त्यांच्या भागाची चांगली माहिती आणि जाण आहे. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रीमंडळात करणे ही मुख्यमंत्र्यांसाठीही समाधानाची बाब आहे असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment