विलासराव देशमुखांचे पार्थिव पंचतत्वात विलीन

लातूर: केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी बाभूळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनाला देशभरातील महत्वाच्या व्यक्तींबरोबरच मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सुमारे तीन लाख जणांनी बाभूळगावात गर्दी केली. या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, कृषिमंत्री शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलासरावांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यासह विलासरावांच्या लाखो चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

विलासरावांचे चिरंजीव आमदार अमीत देशमुख यांनी पार्थिवाला अग्नी दिला. संध्याकाळी पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.