रामदेव बाबांच्या आंदोलनात घातपाताची गुप्तचरांची सूचना

नवी दिल्ली: योग गुरू रामदेव बाबा यांच्या आंदोलनात दहशतवादी घातपात घडवून आणू शकतात अशी शक्यता भारतीय गुप्तचरांनी वर्तविली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्याची सूचनाही आयबी या गुप्तचर संस्थेने आपल्या अहवालात केली आहे.

बाबांच्या आंदोलनात रोज नवा वाद निर्माण होत आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी मागील आंदोलनात मरण पावलेल्या राजबाला हिचा शहीद म्हणून उल्लेख केल्याने वादाला तोड फुटले. पहिल्या दिवशी बाबांचे समर्थक बाळकृष्ण यांच्या छायाचित्रावरून वाद झडला.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी व्यासपीठावर लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या छायाचित्रात बाळकृष्ण यांचे छायाचित्रही लावण्यात आले. बाळकृष्ण यांना बनावट पारपत्र प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी राजबालाला शहीद दर्जा देऊन तिच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांच्या छायाचित्रात राजबालाचे छायाचित्रही लावण्यात आले. रामदेवबाबांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या लाठीमारात राजबाला जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला स्वातंत्र्यसैनिकांच्या पंक्तीत बसविल्याने आंदोलन स्थळी वाद झाला. त्यानंतर तिचे छायाचित्र काढून टाकले गेले.