कृपाशंकर सिंग यांची आणखी मालमत्ता उघड

मुंबई: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांची अवैध मालमत्ता तपासणीचे काम करणार्‍या विशेष कृती दलाला त्यांच्या जावई आणि मुलीच्या नावावर मुंबईत आणखी एक मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. साकीनाका येथील या मालमत्तेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये एवढी आहे.

साकीनाका परिसरात सिंग यांची मुलगी सुनीता सिंग आणि जावई विजय सिंग यांच्या नावावर असलेल्या या इमारतीत एका प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय चालतो. या प्रेसबाबत अधिक माहिती देण्यास विशेष कृती दलाच्या अधिकार्यांनी नकार दिला.

दरम्यान; पोलीस दलाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याबरोबर हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांचा सत्कारही करण्यात आला. घोटाळ्यात अडकलेल्या सिंग यांना आमंत्रित केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने पोलीस दलाचा निषेध केला आहे.

Leave a Comment