जया बच्चन यांची गृहमंत्र्यांनी मागितली माफी

नवी दिल्ली दि. ९ – लोकसभेतील माफी सत्र आज राज्य सभेतही सुरू राहिले. नवे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर पहिल्याच भाषणात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. शिंदे यांच्या एका वक्तव्यावरुन खासदार जया बच्चन जाम भडकल्या. त्यांचा रुद्रावतार पाहुन शिंदे यांनी नमते घेत  जया बच्चन यांची माफी मागितली.

राज्यसभेमध्ये हा प्रकार घडला. आसामच्या मुद्यावरुन सुशीलकुमार शिंदे निवेदन देत होते. शिंदे बोलत असतानाच जया बच्चन मध्येच बोलत होत्या. आधी माझे बोलणे होऊ द्या, थोडे थांबा, तुम्ही बहिणीसारख्या आहात, असे शिंदे वारंवार म्हणत होते. अखेर शिंदेही संतप्त झाले. हा अतिशय गंभीर विषय आहे. सिनेमाचा विषय नाही. तुम्ही बसा, अशा शब्दात शिंदे यांनी सुनावताच  जया बच्चन भडकल्या. जया यांच्या पाठीशी विरोधी पक्षही उभे राहीले. गदारोळ वाढताच शिंदे यांनी नमते घेतले आणि जयाजी यांना वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. त्या माझ्या बहीणीसारख्या आहेत असे सांगितले.

काल लोकसभेमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या वक्तव्यावरुन सोनिया गांधी भडकल्या होत्या. त्यांच्या रुद्रावतारापुढे अडवाणी यांनी नमते घेत विधान मागे घेतले होते आणि माफी मागितली होती.