रामलीलावर रामदेवबाबांचे उपोषण सुरू

 

नवी दिल्ली दि. ९ – योगगुरू रामदेवबाबा यांनी परदेशात भारतीयांनी ठेवलेले काळा पैसा देशात परत आणावा या मागणीसाठी आजपासून रामलीला मैदानात उपोषण सुरू केले. उपोषणाला सुरवात करण्याआधी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. रामलीला मैदानावर रामदेवबाबाचे सुमारे दहा हजार समर्थक उपस्थित आहेत. रामदेवबाबांनी लोकपाल बिलाचा मुद्दाही या आंदोलनात समाविष्ट केला असून त्यांना आंदोलनासाठी ३० ऑगस्ट पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. रामलीला मैदानात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जून मध्येही रामदेवबाबा यांनी याच जागी आंदोलन केले होते मात्र तेव्हा पोलिसांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण देऊन मध्यरात्री आंदोलकांवर लाठीमार केला होता आणि जीव वाचविण्यासाठी रामदेवबाबांना स्त्री वेश धारण करून पलायन करावे लागले होते.

रामदेवबाबांच्या या आंदोलनात अण्णा हजारेही सामील होणार होते मात्र ते दिल्लीत हजर राहिलेले नाहीत. अण्णा उपोशानाठी सामील होणार नाहीत असे समजते.