लंडन ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पहिलेच कांस्यपदक मिळवून इतिहास घडविणार्या साईना नेहवालने या स्पर्धेवरच पूर्ण लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या विविध ऑफर्स नाकारल्या असल्याचे तिचे वडील कृषी शास्त्रज्ञ डॉ.हरवीर सिंग यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.
साईनाला भूक मेडल्सची – पैशांची नाही
साईनाने बॅडमिंटनमधले पहिले ऑलिंपिक देशाला मिळवून देऊन इतिहास रचला आहे. मात्र या स्पर्धेपूर्वीच साईनाला पाच ते सहा टॉप ब्रँडेड कंपन्यांकडून कमर्शिअल्ससाठी ऑफर आल्या होत्या. त्यातील तीन कंपन्या तर वाहन, ड्रिंक आणि इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील जायंट कंपन्या आहेत. शिवाय अन्य कंपन्यांनीही विविध ऑफर साईनाला दिल्या होत्या. या तीन बड्या कंपन्यांनी जाहिरात करण्यासाठी साईनाला प्रत्येकी ५० लाख रूपयांची ऑफर दिली होती. मात्र ऑलिंपिक पदकाचीच भूक लागलेल्या साईनाने या कंपन्यांना जाहिरातीसाठी त्यावेळी नकार दिल्याचे समजते.
साईनाने यापूर्वीही जाहिराती केल्या आहेत. तसे तिने गतवर्षी इंडोनेशिन आणि थायलंड ओपन स्पर्धा जिकल्यानंतरही तिची मागणी खूपच वाढली होती. मात्र ऑलिंपिकवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता यावे यासाठी साईनाने हा निर्णय घेतला. जाहिरात अथवा कमर्शियल करताना शूटिंगसाठी खूप वेळ द्यावा लागतो. प्रवासात खूप वेळ जातो आणि त्यामुळे सरावावर लक्ष केंद्रीत करणे जमत नाही. विश्रांती मिळत नाही. जगात पाचव्या स्थानावर असलेल्या साईनाला असले कोणतेही अडथळे तिच्या ऑलिंपिकसाठीच्या तयारीत नकोच होते आणि त्यामुळेच तिने मोठ्या रकमांची ऑफर येऊनही पैशांपेक्षा खेळाला अधिक महत्त्व दिले आणि त्यासाठी आम्ही घरच्या लोकांनीही तिला पूर्ण पाठिंबा दिला असेही तिचे वडील म्हणाले.
