टीम अण्णा संपुष्टात: राजकीय प्रवेशाचा सावळा गोंधळ

नवी दिल्ली: औपचारिकरित्या अस्तित्व नसलेली टीम अण्णा बरखास्त केल्याची घोषणा करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी आपल्याच सहकाऱ्यांना झटका दिला आहे. त्याचप्रमाणे रविवारच्या बैठकीत राजकीय पर्याय देण्याची जोरकस भाषा करणार्या अण्णांनी पक्ष उभारणीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत आणि अटीही घातल्या आहेत.

रस्त्यावर चाललेली लढाई संसदेत गेल्याशिवाय लोकपालची मागणी मान्य होणार नाही; असा नारा देऊन टीम अण्णाने राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर जंतरमंतरवरील उपोषण थांबविण्यात आले. पक्ष उभारणीसाठी देशभर दौरे करण्याची घोषणाही अण्णांनी यावेळी केली. रविवारी झालेल्या टीम अण्णाच्या बैठकीतही केवळ पक्ष उभारणी आणि राजकीय पर्याय याच विषयांवर चर्चा झाली. अण्णाही या चर्चेत सहभागी झाले.

सोमवारी मात्र अण्णांनी आपल्या ब्लॉगवर अनपेक्षितपणे टीम अण्णा बरखास्त केल्याची घोषणा केली. वास्तविक टीम अण्णाला औपचारिक अस्तित्व नाही. आंदोलन आणि तत्संबंधी सर्व बाबी इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेच्या नावाखाली सुरू होत्या. टीम अण्णा म्हणून संबोधली जाणारी कोअर कमिटीही याच संस्थेच्या झेंड्याखाली होती. त्यामुळे टीम अण्णा बरखास्त करण्याच्या अण्णांच्या घोषणेचा नेमका अर्थ काय; हा एक प्रश्नच आहे. टीम अण्णाने राजकीय पक्ष काढण्याची घोषणा करण्यापूर्वी आणि नंतर पडद्यावर आणि पडद्यामागे अनेक घटना घडल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यापैकी अनेकांनी अण्णांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे अण्णा या ‘राजकीय टीम’ पासून स्वत:ला बाजूला काढण्याच्या विचारात असावेत असा एक मतप्रवाह आहे.

टीम अण्णाच्या राजकारण प्रवेशाबाबत झालेल्या चर्चेत किंवा बैठकीत कधीही न केलेले प्रश्न आणि घातलेल्या अटी अचनक सोमवारी ब्लॉगच्या माध्यमातून पुढे आणण्याची अण्णांची कृतीही या मतप्रवाहाला दुजोरा देणारा आहे. टीम अण्णाच्या पक्षातून निवडणूक लढविणार्या उमेदवाराला लोक तो प्रामाणिक असल्यामुळे मते देतील. मात्र खुर्चीचे वारे लागल्यावर तो ‘बिघडला’ तर त्याचे काय करायचे; असा सवाल अण्णांनी केला आहे. त्याचप्रमाणे जंतरमंतरवर जमलेल्या गर्दीने आम्हाला राजकीय पर्याय हवा असा कौल दिला म्हणजे तो पूर्ण देशाचा कौल आहे असे नाही; याचा साक्षात्कार अण्णांना सोमवारी अचानक झाला आहे. त्यामुळे देशातील ६ लाख गावांच्या ग्रामसभांनी ठराव करून सांगावे की आम्हाला राजकीय पर्याय हवा आहे; अशी अण्णांची अपेक्षा आहे.

अण्णांच्या या अनाकलनीय भूमिकेमुळे अस्सल राजकारण्यांना उकळ्या फुटतील. अण्णा समर्थक आणि त्यांच्याकडे आशेने बघणार्या सर्वसामान्य माणसांचा मात्र त्यामुळे गोंधळ उडणार आहे.