गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर

पुणे दि.४ – पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या चार बॉम्बस्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुणे भेटीवर येत असून या भेटीत ते बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांची पाहणी करणार आहेत तसेच तपासकामची चौकशी करणार आहेत. पुण्यात सुरक्षेच्या दृष्टीने काय काय उपाययोजना केल्या जात आहेत याचा आढावाही ते या भेटीत घेणार असल्याचे समजते.

बॉम्बस्फोटाचा तपास करणार्‍या पथकांनी पुण्यातच मुख्यालय असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेवरच प्रमुख संशयित म्हणून शिक्कामोर्तब केले असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी अन्य अँगल्सही विचारात घेतले जात आहेत. ज्या दोन सायकलींत हे बॉम्ब ठेवण्यात आले होते, त्या सायकली विकल्या गेलेल्या दुकानदारांकडून संशयितांची माहिती घेऊन रेखाचित्रे तयार करण्यात आली असली तरी ती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. ही रेखाचित्रे सध्या फक्त तपास अधिकार्‍यांना व तपास पथकांनाच देण्यात आली आहेत असेही समजते.

पोलिस विभागाने सर्व मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधला आहे आणि बॉम्बस्फोटाच्या अगोदर किंवा नंतर कांही संशयास्पद कॉल झाले आहेत का याचा तपास सुरू केला आहे. अर्थात या कांही मिनिटांत लक्षावधी कॉल केले गेले असणार हे गृहित धरून त्या सर्व कॉलची पडताळणी करून संशयित कॉल शोधणे या कामासाठी थोडा वेळ लागणार असल्याचेही या अधिकार्‍यांनी सांगितले.

ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाले त्या दिवशी म्हणजे १ ऑगस्टलाच केंद्रीय गृहमंत्री एका कार्यक्रमानिमित्त पुणे भेटीवर येणार होते मात्र स्फोट झाल्याने गृहमंत्र्यांची भेट रद्द करण्यात आली होती.