राष्ट्रपतींची वेबसाईट आता इंटरअ‍ॅक्टीव्ह

नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याशी जनतेला थेट संवाद साधता यावा या दृष्टीने राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाईटमध्ये अनेक सुधारणा करून ती अधिक इंटरअ‍ॅक्टीव्ह बनविण्यात आली आहे. ही वेबसाईट फेसबुक आणि यू ट्यूब सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सशी जोडण्यात आल्याने राष्ट्रपतींशी संपर्क साधणे सर्वसामान्य नेटिझन्सना शक्य होणार आहे.

मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून नव्या स्वरूपातील ही वेबसाईट नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. या साईटच्या माध्यमातून राष्ट्रपतींशी संपर्क साधायचा असल्यास या साईटवर असलेल्या ‘राईट टू दि प्रेसिडेंट’ या ऑप्शनवर क्लिक केल्यास नागरिकांनी लिहिलेला निरोप थेट राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचेल.

या नव्या स्वरूपातील वेबसाईटमध्ये व्हिडीओ गॅलरीचाही समावेश करण्यात आला असून ही साईट अद्ययावत ठेवण्याबाबत कटाक्ष ठेवला जाईल; अशी ग्वाही राष्ट्रपतींच्या सचिव ओमिता पॉल यांनी या वेबसाईटचे उद्घाटन करताना दिली. या साईटवरील नव्या सुविधांमुळे राष्ट्रपती आणि जनता यांच्यात सुसंवाद साधण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment