पुणे: जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन संशयितांची रेखाचित्र पोलिसांनी तयार केली आहेत. मात्र ही रेखाचित्र प्रसिद्ध करण्याऐवजी तपासाशी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाच त्याच्या प्रती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व ते गरवारे पूल या दरम्यान दि. १ ओगस्ट रोजी रात्री साडेसात ते सव्वा आठ यावेळेत ४ बॉम्बस्फोट झाले तर दोन बॉम्ब निकामी करण्यात आले. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि शहर गुन्हे शाखेचे संयुक्त पथक करीत असून राष्ट्रीय तपास यंत्रणा समांतर तपास करीत आहे.
ज्या दोन सायकलीवर बॉम्ब ठेवण्यात आले त्या सायकली कसबा पेठेतील एका दुकानातून खरेदी करण्यात आल्या. या दुकानाचे मालक आणि कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन ही रेखाचित्र तयार करण्यात आली आहेत.
पोलिसांनी या काळात संबंधित मोबाईल टॉवरवरून आलेल्या आणि गेलेल्या मोबाईल कॉल्सची माहितीही मोबाईल कंपन्यांकडून मागविली आहे. या लाखो कॉल्सचे विश्लेषण करून त्यावरून काही माग मिळतो का; या प्रयत्नात पोलीस आहेत.