नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवृत्त लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन जंतर मंतर मैदानावरील उपोषणाची सांगता केली. यापुढे मतदारांना योग्य पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राजकारणात प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत यावेळी टीम अण्णाने दिले.
आपण आजपर्यंत निवडणूक लढविणार नाही; राजकीय पक्ष काढणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र सर्वच पक्षात भ्रष्टाचारी लोकांचा भरणा असताना मतदारांपुढे प्रभावी पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने लोकांच्या आग्रहावरूनच आता टीम अण्णा राजकारणात उतरेल; असे अण्णांनी यावेळी सांगितले. असा राजकीय पर्याय उभा करण्यासाठी आपण देशभर दौरा करणार असून आगामी निवडणुकीत जनता भ्रष्ट उमेदवारांना डावलून नव्या पर्यायाचा विचार करेल; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आता पुढच्या टप्प्यात आले असून आता राजकारणाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला कसून विरोध करू; असे टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
सध्या देशात सन १९७५ प्रमाणे राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन टीम अण्णाचे हात बळकट करावे; असे आवाहन जनरल सिंग यांनी केले.