कांस्यपदकावर दैवाने कोरले सायनाचे नाव

लंडन: भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहेवाल हिला अखेर शनिवारच्या लढतीत नशीबाने चांगलाच हात दिला. दुखापतग्रस्त झालेली चीनी टेनिसपटू झिन वँग हिने खेळातून माघार घेतली आणि सायनाचे नाव कांस्य पदकावर कोरले गेले.

शुक्रवारच्या लढतीत चीनच्याच अव्वल मानांकित यीहान वँगकडून पराभूत झालेल्या सायनाची शनिवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या झिन बरोबर लढत झाली. सायनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत झिनला चांगली झुंज दिली. मात्र झिनने सायनावर आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये झिन सायनाला नमविणार अशी चिन्ह दिसत असतानाच झिनच्या पायाला दुखापत झाली. मात्र ती पायाला क्रेप गुंडाळून जिद्दीने पुन्हा मैदानात उतरली. त्या अवस्थेतही तिने पहिला गेम जिंकलाही. मात्र दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला दुखापतीने झिनच्या जिद्दीला नमविले. अखेर तिने खेळातून माघार घेतली आणि सायनाला विजयी घोषित करण्यात आले.

या सामन्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने कोर्ट दणाणून सोडले. या टाळ्या जशा विजयी सायनाच्या अभिनंदनासाठी होत्या तशाच त्या झिनच्या जिद्दीचे कौतुक करणारयाही होत्या.