तटकरे, भुजबळांना पवारांची क्लीन चीट

मुंबई: राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय कृषिमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी क्लीन चिट दिली. या दोघांवर ज्याबाबत भ्रष्टाचारचे आरोप केले जात आहेत; त्या व्यवहाराची कागदपत्रे मी स्वत: पाहिली असून त्यात कोणतीही अनुचित बाब नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांची शनिवारी पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा पातळीवर पक्षाची वाढ करण्याच्या दृष्टीने येणार्या अडचणी समजावून घेऊन पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतानाच पवार यांनी या मंत्रीद्वयाला क्लीन चीट दिली.

तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळा, बनावट कंपन्या स्थापन करून आर्थिक आणि जमिनीचे गैरव्यवहार अशा स्वरूपाचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत तर भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे कंत्राट आपल्याच कुटुंबियांच्या कंपन्यांना दिल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. याबाबत चौकशी केली जाईल; असे आश्वासन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सभागृहात दिले होते. तत्कालीन केंद्रीय कंपनी कामकाज मंत्री वीरप्पा मोईली यांनीही चौकशीचे आदेश दिल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर पवार यांनी या दोघा मंत्र्यांना दिलासा दिला आहे. आरोप करण्यात आलेल्या कामांपैकी कोणत्याही कामात तटकरे आणि भुजबळ यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केलेला नाही; असे सांगत पवारांनी त्यांची पाठराखण केली आहे.

दरम्यान; शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक मुंबईत शनिवारी पार पडली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तसेच स्वातंत्र्य आताही मिळणे आवश्यक असून त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हस्तक्षेप करू नये; अशी आग्रही मागणी या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Leave a Comment