अंधारात बुडलेल्या नॅशनल ग्रीडला गुजराथेतून प्रकाश

नवी दिल्ली दि.२ – ग्रीड कोलॅप्स झाल्यामुळे लागोपाठ दोन दिवस निम्मा देश अंधारात बुडण्याची घटना अगदी ताजी असताना  गुजराथ राज्याने नॅशनल पॉवर ग्रीडला प्रकाशाचा किरण दाखविला आहे. गुजराथने नॅशनल ग्रीडला दोन हजार मेगावॉट वीज पुरविण्याची तयारी दाखविली असून त्याबदल्यात स्वस्त पेट्रोलची मागणी केली आहे असे समजते.

नॉर्थ ईस्ट, इस्टर्न आणि नॉर्दन इंडिया अशी तीनही ग्रीड बंद पडल्याने राजधानी दिल्ली सह देशातील २२ राज्ये अंधारात बुडाली होती.वीज टंचाईमुळे कांही नियमापेक्षा जादा वीज खेचल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यातही आले. मात्र देशात वीजेची टंचाई आहे ही वस्तुस्थिती आहे. गुजराथचे उर्जामंत्री सौरभ पटेल यांनी या परिस्थितीत केंद्राने परवागनी दिल्यास गुजराथ त्यांच्याकडील अतिरिक्स दोन हजार मेगावॉट वीज नॅशनल ग्रीडला देण्याची तयारी दर्शविली आहे. देशातील सध्याच्या वीज टंचाईवरचा हाच सर्वाधिक जलद तोडगा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गुजराथने गेल्या दहा वर्षात वीज निर्मितीत क्रांती केली असून गेल्या दशकात तब्बल ८ हजार मेगावॉट वीज निर्मिती केली आहे. राज्याच्या दृष्टीने ही मोठी अचिव्हमेंट आहे. आज गुजराथेची वीज निर्मिती १५ हजार९०६ मेगावॉट असून त्यांची गरज १२ हजार मेगावॉटची आहे. २०११-१२ या सालात गुजराथेने त्यांच्या वीज निर्मितीत सौर उर्जेच्या स्वरूपात ६०० मेगावॉटची भर घातली आहे. विशेष म्हणजे देशात सौरउर्जेद्वारे केवळ ११० मेगावॉट वीज निर्मिती होते. गुजराथने डिसेंबर अखेर १८ हजार मेगावॉट वीज निर्मितीचे ध्येय ठेवले असून ते त्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत असेही पटेल म्हणाले. नॅशनल ग्रीडला वीज देण्याची आमची तयारी आहे मात्र त्याबदल्यात आम्हाला कमी दरात पेट्रोल पुरविले जावे अशी गुजराथ राज्याची मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.