गुंतवणुकीसाठी भारताने पाकला दरवाजे उघडले

नवी दिल्ली दि.२ – पाकिस्तानला भारतात गुंतवणुक करण्यास असलेली बंदी केंद्राने नुकतीच उठविली असून कही क्षेत्रे वगळता पाकिस्तानातील नागरिक वैयक्तिक पातळीवर भारतात गुंतवणूक करू शकणार आहेत. तसेच अन्य गुंतवणूकदार व कंपन्यानाही भारतात गुंतवणूक करणे आता शक्य होणार आहे. भारत पाक संबंध सुधारणेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

भारत पाक व्हिसा धोरण सोपे व सुटसुटीत करण्याबाबतही सध्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा फळाला आली तर दोन्ही देशातील गुंतवणूकदार , व्यापारी तसेच कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिकारी एकमेकांच्या देशात सहज येजा करू शकणार आहेत. दोन्ही देशातील प्रमुख बँकांनी एकमेकांच्या देशात शाखा उघडण्याबाबतचे धोरणही सध्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. दोन्ही देशातील आर्थिक संबंध सुधारले तर दोन्ही देशातील तणाव कमी होण्यास तसेच सीमाभागात शांतता नांदण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे भारताने पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा पूर्वीच दिला असला तरी पाकिस्तानने मात्र असा दर्जा भारताला अद्याप दिलेला नाही. गुंतवणुकींवरील बंदी हटविल्यामुळे आता पाकिस्तान कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर भारताला असा दर्जा देईल असे संकेत दिले जात आहेत. अर्थात भारताने पाकिस्तानवरील गुंतवणूक निर्बध उठविले असले तरी संरक्षण, अंतराळ आणि अणुउर्जा क्षेत्रात पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करता येणार नाही तसेच अन्य क्षेत्रात गुंतवणूक करतानाही संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि गृहमंत्र्यालयाची परवानगी घ्यावी लागेल असेही सबंधित अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment