सांगली: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते.
ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले कालवश
गळा बांधुनिया दोर; धरिला पंढरीचा चोर, कुठ कुठ जायचं हनिमूनला अशा अजूनही आठवणीत राहिलेल्या गाण्यांना पळसुले यांनी संगीताचा साज चढविला . सुधारलेल्या बायका हा त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी, गुजराती, भोजपुरी या भाषेतील तब्बल दीडशे चित्रपटांना संगीत दिले. सदाशिवराव बुवा यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. भिंगरी, थापाड्या, फटाकडी, सासुरवाशीण, पंढरीची वारी, कळतंय पण वळत नाय, गाढवाचे लग्न, डाळिंबी, हिंदीतील लो आ गये हम हे त्यांचे गाजलेले चित्रपट. गोऱ्या गोऱ्यां टाचत काटा घुसला, थाप मारून थापाड्या गेला ही त्यांची गाणीही विशेष गाजली.
होनाजी बाळा आणि पठ्ठे बापूराव यांच्या लोकगीतांना त्यांनी स्वरबद्ध केले. दिल्ली आकाशवाणीने या लोकगीतांचे प्रसारण केले.
दादासाहेब फाळके अकादमीचा उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार, चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, सूरसिंगार अकादमीचा स्वामी भगवती आणि स्वामी हरिदास पुरस्कार अशा पुरस्कारांनी पळसुले यांना सन्मानित करण्यात आले.
पळसुले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी एका अवलिया आणि हरहुन्नरी कलावंताला मुकली आहे; अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
