शिलॉंग: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार पी. ए. संगमा हे लवकरच नेशनल इंडीजीनस पीपल्स पार्टी नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती त्यांच्या विश्वासू सहकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. हा पक्ष ओगस्ट महिन्यात स्थापन होणार असल्याचा दावाही त्याने केला.
संगमा स्वतंत्र पक्ष स्थापणार
संगमा यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार आणि तारिक अन्वर यांच्याबरोबर काँग्रेसशी काडीमोड घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापकांपैकी संगमा हे ही एक आहेत. मात्र पवारांशी त्यांचे फार काळ सूत जमले नाही.
आपल्या आदिवासी आणि अल्पसंख्यांक असण्याबरोबरच बुद्धीमत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय नेतेपद आणि विशेषत: लोकसभा सभापती पदाच्या काळात देशवासीयांच्या मनात आदराचे स्थान संगमा यांनी प्राप्त केले. मात्र कालांतराने त्यांचे राजकारण केवळ आत्मकेंद्री बनले.
राष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर केल्यावर संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थातच संगमा यांना पाठींबा नाकारला. संगमा यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि मेघालयातील आमदारकीचा राजीनामा दिला.
आता नव्या पक्षाच्या माध्यमातून संगमा नवा खेळ मांडू पाहत आहेत.
