उत्तरेतील दिल्लीसह सहा राज्ये काळोखात

नवी दिल्ली दि.३० – सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास उत्तरेकडील ग्रीड बंद पडल्याने सहा राज्ये काळोखात बुडाली असून त्यात दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश , हिमाचल व राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. दिल्लीतील मेट्रोसेवेवर याचा मोठा परिणाम झाला असून सध्या केवळ २५ टक्के मेट्रोच रूळावर धावू शकत आहेत. भूतानमधून मिळालेल्या हायडल पॉवरवर मेट्रो तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान येथील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पॉवर सिस्टीम ऑपरेटिंग कंपनीचे सीईओ एस.के.सूनी यांनी सांगितले.

कोणत्यातरी राज्याने जादा वीज खेचल्याने हे ग्रीड बंद पडल्याचे समजते. पहाटेपासूनच वीजमंडळाचे इंजिनिअर्स वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरवातीला सार्वजनिक सेवा म्हणजे रेल्वे, मेट्रो तसेच रूग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक ए.एम. नायक यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत दररोज सरासरी १८ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करतात. सकाळपासून मेट्रोचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशाना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दिल्ली विमानतळावर बॅकअपचा वापर करून वीज पुरविली जात आहे. १० वर्षातील वीजमंडळासमोर आलेली ही सर्वात मोठी अडचण असल्याचेही सांगितले जात आहे.