‘मुलींनी तोकडे कपडे घालण्यामुळेच छेडछाडीच्या प्रकारात वाढ’: बंगाली खासदाराची मल्लीनाथी

कोलकाता: पश्चिम बंगालमधील एका खासदाराने केलेल्या वक्तव्यावरून मोठे रान माजण्याची चिन्ह आहेत. मुलींनी तोकडे कपडे घालण्यामुळेच छेडछाडीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे मत या महोदयांनी व्यक्त केले आहे.

नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील बरसात या खासदार दीपक चक्रवर्ती प्रतिनिधीत्व करीत असलेल्या लोकसभा मतदारसंघात घडलेल्या छेडछाडीच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

महिलांची छेडछाड हा प्रकार पुरातन काळापासून चालत आलेला आहे. त्यात नवीन काही नाही. मात्र मुली, महिलांनी तोकडे आणि देहप्रदर्शन करणारे कपडे परिधान केल्यामुळे विशेषत: तरुणांची मने चाळविली जातात आणि त्यातून छेडछाडीच्या प्रमाणात वाढ होते; असे मत चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

छेडछाडीचे प्रकार निषेधार्हच आहेत. मात्र रावण अस्तित्वात असल्याशिवाय रामायण घडत नाही; अशी मल्लीनाथीही त्यांनी केली.