पुण्यात सर्रास मिळतोय गुटखा व पानमसाला

पुणे दि.२६- राज्य शासनाने २० जुलैपासून राज्यभर गुटखा व पानमसाला यांच्या विक्रीवर व वितरणावर बंदी घातली असली तरी पुण्यात आजही पानाच्या टपर्‍यांवर गुटखा आणि पानमसाला सर्रास विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फरक इतकाच की पूर्वी गुटखा अणि पानमसाल्याच्या पाकिटांवर छापलेल्या किमतीतच तो मिळत होता आता मात्र तो दुप्पट किमतीला विकला जात आहे.

गोवा १००० चे पाकिट तीन रूपयांऐवजी पाच किवा सहा रूपयांना विकले जात आहे. एकदम जास्त पाकिटे घेतली तर चार रूपयांनाही मिळत आहे. विमल गुटख्याचे पाच रूपयांचे पाकिट १० रूपयांना सर्रास विकले जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या संदर्भात धाड सत्र सुरू केले आहे व त्यात गेल्या आठवड्यात ११ लाख रूपयांचा माल जप्तही करण्यात आला. पानदुकानदारांवर गुटका व पानमसाला विक्री व साठवण करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र शहराच्या विविध भागातील दुकानात याबाबत चौकशी केली असता प्रथम नकार देण्यात येत असला तरी आग्रह केल्यावर जादा दराने पानमसाला आणि गुटखा उपलब्ध करून दिला जात असल्याचे आढळले आहे.

कांही दुकानदारांनी दुकानात माल ठेवलेला नाही मात्र आसपासच्या जागांत ठेवला आहे. मागणीप्रमाणे तो पुरविण्यात येतो. एका दुकानदाराने सांगितले की दर अर्ध्या तासाने तो थोडा थोडा माल आणतो, तो ताबडतोब संपतो. कॅम्प भागातील एका दुकानदाराने तर कधीही मागा मिळेल असे सांगतानाच भविष्यातही गुटखा आणि पानमसाल्याचा पुरवठा सुरळीत राहील अशी खात्री दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दिलीप संगत याविषयी म्हणाले की आम्ही धाडी टाकतो आहोत. पण ही विक्री पूर्णपणे बंद होण्यास अजून काही काळ लागेल. पानविक्रेत्यांनीच हे पदार्थ विकण्यातला धोका आणि त्यामुळे आरोग्याला होत असलेला अपाय समजून घेतला तर ही बंदी अमलात आणणे अधिक सोईचे होणार आहे.