दोषी असल्यास फाशी द्या – नरेंद्र मोदी

गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोध्रा हत्याकांड प्रकरणी ते दोषी असतील तर त्यांना फाशी द्या असे एका उर्दू वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. उर्दू वर्तमानपत्राला मोदी यांनी दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे.
 
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार नई दुनिया या वर्तमानपत्राचे संपादक सिद्दीकी यांनी ही मुलाखत घेतली. सिद्दीकी माजी राज्यसभा सदस्य आहेत आणि समाजवादी पक्षाचे नेतेही आहेत. याविषयी सांगताना ते म्हणाले की मुंबईतील माझ्या दोन मित्रांशी झालेल्या वार्तालापात गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याविषयी चर्चा झाली तेव्हा या दोघांनीही मुलाखत घ्यावी, त्यामुळे अनेक प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागेल आणि गैरसमज दूर होतील असा सल्ला दिला. त्यानुसार मोदी यांच्या कार्यालयाकडे मुलाखतीसाठी विचारणा करण्यात आली. त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील अशी अटही घालण्यात आली होती. मोदी याला तयार होतील का अशी शंकाही होतीच.

मात्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सिद्निकींना आश्चर्य वाटले. यापूर्वी गोध्रा प्रकरणाबद्दल प्रश्न विचारताच मोदी मुलाखत सोडून निघून गेल्याचे त्यांच्या कानावर होते. मात्र सिद्दीकींनी घेतलेल्या मुलाखतीत मोदींना जे प्रश्न विचारण्यात आले त्या सर्वांची त्यांनी उत्तरे तर दिलीच पण गोध्रा प्रकरणावर प्रश्न विचारताच मोदींनी या प्रकरणात ते दोषी असतील तर त्यांना खुशाल फाशी द्यावे असेही सांगितले.

Leave a Comment