मेलबोर्न दि.२६ – उडत्या तबकड्या पाहिल्याच्या घटना सांगणार्या ऑस्ट्रेलियन नागरिकांची संख्या अलिकडे वाढू लागली असून या घटना आता वारंवारच ऐकू येत आहेत. यामागे परग्रहावर जीवन आहे याचा लोकांत वाढत चाललेला विश्वास हेच कारण असल्याचे सांगितले जात असले तरी इंटरनॅशनल स्टडीज संस्थेने मात्र या घटना नुसत्या हसण्यावारी नेण्याच्या नाहीत असा इशारा दिला आहे.
ऑस्ट्रेलियात पुन्हा दिसल्या उडत्या तबकड्या
या संस्थेतील यूएफओ विषयाचे संशोधक मोर्फेट यांचे असे म्हणणे आहे की नागरिक जेव्हा उडती तबकडी पाहिल्याचे सांगतात तेव्हा अजूनही समाज त्यांची अवहेलना करतो. प्रसारमाध्यमे कांहीतरी सनसनाटी बातमी या नजरेनेच त्यांच्याकडे पाहतात. गेल्याच आठवड्यात एनएसडब्ल्यू किनार्यावर उडती तबकडी दिसल्याचा व्हिडीओ यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आला आहे. मोर्फेट गेली वीस वर्षे या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते या विषयाकडे केवळ सनसनाटी म्हणून पाहण्यापेक्षा विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. आपल्या आकाशगंगेत १०० बिलीयन तारे आणि ग्रह आहेत आणि ते आपल्या पृथ्वीपेक्षा कितीतरी जुने आहेत. एवढे मान्य केले तर परग्रहांवरही जीवसृष्टी असू शकते हे एकदम नाकारता येणार नाही.
सेंट्रल कोस्टवर राहणार्या ५१ वर्षीय जेन पूली या महिलेनेही नुकतेच ब्रिस्ब्रेन जलाशयावर शांतपणे तरंगत असलेले आणि फिरते दिवे असलेले विमानसदृश कांही तरी पाहिल्याचे वरील संस्थेला कळविले आहे. जेन याच जलाशयाच्या परिसरात राहते आणि ऑस्ट्रेलियातील ही जागा यूएफओचा हॉट स्पॉट असल्याचे समजते. कारण अनेकांनी याच भागात यूएफओ पाहिल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
