ऑक्सफर्ड विद्यापीठात इंदिरा गांधी अध्यासन

नवी  दिल्ली दि.२५- भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी उद्या शपथ घेत आहेत. त्यापूर्वी अर्थमंत्री असणार्‍या प्रणवदांनी त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कारकीर्दीत सही केलेला शेवटचा प्रस्ताव कोणता असेल याची उत्सुकता वाटते काय? मग त्याचे उत्तर असे आहे की ग्रामीण व्यवहार मंत्री जयराम रमेश यांच्या प्रस्तावावर ही सही करण्यात आली आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यासन सुरू करण्याचा हा प्रस्ताव आहे. ऑक्सफर्डच्या सॉमरव्हीले कॉलेजात हे अध्यासन स्थापण्यात येणार असून ते २०१७ सालात सुरू होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हे साल इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे साल आहे. अर्थात यासाठी देण्यात येणारे अनुदान विश्वभारतीला देण्यात येणार्‍या १५० कोटी रूपयांच्या अनुदानातूनच दिले जाणार आहे असे समजते.

इंदिरा गांधी १९३० साली विश्वभारतीच्या विद्यार्थीनी होत्या. रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले हे विद्यापीठ. यंदा रविंद्रनाथांची १५० जयंती साजरी होत असून त्यानिमित्ताने या विद्यापीठाला केंद्राकडून १५० कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. १९३७ साली इंदिरा गांधी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सॉमरव्हिले कॉलेजात अध्ययन करत होत्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या हा शैक्षणिक कोर्स पूर्ण करू शकल्या नव्हत्या. या ठिकाणी इंदिरा गांधी यांच्या नावाने ऑक्सफर्ड इंडिया केंद्राची स्थापना केली जात असून १० एकर जागेत रॅडक्लिफ येथे हे केंद्र उभारण्यात येणार आहे. आक्सफर्ड मिडल इस्ट सेंटर तसेच ऑक्सफर्ड चायना सेंटर अशी अन्य देशांची केंद्रेही येथे आहेत. भारत केंद्रात इंदिराजीच्या विशेष आवडीच्या विषयांवर अभ्यास करता येणार असून त्यात अन्नसुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि ग्लोबल गव्हर्नन्स या विषयांचा समावेश असल्याचे कळते. या केंद्रासाठी भारत सरकार आणि ऑक्सफर्ड प्रत्येकी २५ टक्के अनुदान देणार असून बाकी रक्कम देणग्यांतून गोळ केली जाणार आहे. भारत यासाठी २५ कोटी रूपयांचे अनुदान देणार आहे.