युपीएला हादरा

केंद्रातल्या सत्ताधारी संपु आघाडी सरकारची स्थिती वरचेवर बिघडत चालली आहे. या आघाडीचे सत्तेवरचे नियंत्रण कमी होत आहे. सार्‍या गोष्टी कशा हातातून निसटत चाललेल्या आहेत. स्थितीवर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित करून लोकांच्या मनामध्ये या आघाडीच्या सरकारविषयी विश्‍वास निर्माण करण्याची धमक असणारा नेता या आघाडीमध्ये आणि कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या तरी कोणी दिसत नाही. शिष्टाईचे काही प्रयत्न करून सरकारची बाजू सावरून धरणारे प्रणव मुखर्जी हे एक नेते होते, पण ते आता राष्ट्रपती होत आहेत. त्यामुळे या आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंग हे फार मोठे नेते आहेत असे आजवर भासवण्यात आले आणि त्यांच्या मुळात सुमार असलेल्या क्षमता उघड्या पडू नयेत म्हणून खूप युक्त्या केल्या गेल्या. परंतु जास्त लोकांची अधिक काळ फसवणूक करता येत नसते हे सत्य आता प्रत्ययाला येत आहे. सोनिया गांधी आदि लोक या देशाला नेतृत्व देण्याच्या क्षमतेचे नाहीत हे सत्य आता अनुभवाला यायला लागले आहे. त्यातूनच सत्ताधारी संपु आघाडीमध्ये खळबळ माजली असून ती पृष्ठभागावर येत आहे.

या नेत्यांची क्षमता नसताना सुद्धा ते आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित करत आहेत अशी रुखरुख शरद पवार यांच्या मनात आहे. त्यामुळेच शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिपदाचे राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपु आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीला शरद पवार हजर नव्हते. यापूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा संपु आघाडीचा उमेदवार ठरविण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला सुद्धा पवारांनी उपस्थिती लावलेली नव्हती. एकंदरीत गेल्या काही आठवड्यांपासून पवार कॉंग्रेस पक्षावर नाराज आहेत, असे दिसते. विशेषत: राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडताना सोनिया गांधी यांनी आपल्याला पुरेसे विश्‍वासात घेतलेले नाही, अशी पवारांची खंत आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली तेव्हाच शरद पवार यांनी राष्ट्रपती हा राजकारणी नसावा, असे म्हणून आपला वेगळा सूर लावलेला होता. परंतु चोवीस तासाच्या आत त्यांनी आपले शब्द मागे घेतले आणि सोनिया गांधींनी समजूत घातल्यामुळे ते प्रणव मुखर्जींच्या मागे उभे राहिले. त्यांची समजूत कशी घातली गेली हे काही कळले नाही.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही पवारांचे काही वेगळे म्हणणे होते. डॉ. हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी न देता त्यांच्या जागी कृषी तज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन् यांना उपराष्ट्रपती करावे, अशी पवारांची इच्छा होती. परंतु पवारांचीच काय पण ममता बॅनर्जी, मुलायमसिंग यांच्याही सूचना कॉंग्रेसने विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते आघाडीचे राजकारण करताना आपल्या मित्र घटक पक्षांना कमी लेखतात अशी भावनाही निर्माण झाली आणि घटक पक्षांमध्ये नाराजी पसरली. ममता बॅनर्जी यांनी ही नाराजी चुकीच्या पद्धतीने व्यक्त केली, परंतु नाराजी होती हे उघड झाले. शरद पवार तर सुरुवातीपासून अनेक गोष्टींमध्ये नाराजच आहेत. राज्यपालांच्या नियुक्त्या करताना कॉंग्रेसचे नेते आपलेच घोडे पुढे दामटतात आणि घटक पक्षांच्या सूचनांना कसलीही किंमत देत नाहीत ही त्यांची पूर्वीचीच तक्रार आहे. लातूरचे शिक्षण तज्ज्ञ राज्यसभा सदस्य डॉ. जनार्दन वाघमारे यांना कोठे तरी राज्यपाल करावे, अशी पवारांची इच्छा आहे. परंतु कॉंग्रेसचे नेते या इच्छेचा मान राखत नाहीत.

सध्या कॉग्रेस पक्षात नेतृत्वाची आणि प्रशासन कौशल्याची मोठीच वाण आहे. डॉ. मनमोहनसिंग ज्या नेत्यांशी बरोबरीच्या नात्याने सल्लामसलत करू शकतात अशा दोन-चार नेत्यांमध्ये पवारांचा समावेश होतो. त्यामुळे मनमोहनसिंग पवारांना किंमत देतात.

असे असले तरी कॉंग्रेसचा एक मोठा शरद पवार यांना कायम शत्रू मानत असतो आणि त्यामुळे शरद पवार सतत दुखावले जातात. त्याचा स्फोट अनेकवेळा झालेलाही आहे. परंतु प्रणव मुखर्जी सक्रिय राजकारणातून बाहेर होताच पवारांची गरज मनमोहनसिंग यांना जास्त जाणवायला लागली आणि नेमक्या अशा वेळीच शरद पवार यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. पवार हे काही कॉंग्रेसचे नेते नाहीत, पण कॉंग्रेसला आज पवारांची गरज आहे. पण एका बाजूला पवारांची गरज मान्य करायची आणि त्याचा फायदाही घ्यायचा. मात्र दुसर्‍या बाजूला पवारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करायचा अशी दुटप्पी नीती कॉंग्रेसचे नेते राबवत असतात. मात्र आता कॉंगेसची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की, त्यांना शरद पवार यांची मदत घेतल्यावाचून काही पर्याय नाही. सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत, मात्र सारे मंत्री अपात्र आहेत आणि त्यात राहुल गांधींच्या रुपाने आणखी एका अपात्र मंत्र्याची भर पडणार आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे चार-दोन मंत्री सोडले तर निर्णय घेण्याची क्षमता कोणातच नाही. त्यामुळे पवारांची नाराजी कॉंग्रेसला परवडणारी नाही.