अव्वलस्थान पटकाविण्याची विराट कोहलीला संधी

भारतीय संघ नव्या जोमाने या मोसमातील पहिल्याच मालिकेसाठी उतरला आहे. श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीतील मालिकेत चारी मुंड्या चित करून जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थान पटकाविण्याची संधी भारतापुढे चालून आली आहे. त्यासोबतच उपकर्णधार  विराट  कोहलीला ही फलंदाजीतील जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थान पटकाविण्याची संधी मिळणार आहे. सध्या तो क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.

अलिकडेच विराट कोहलीने त्याची संघात वेगळी ओळख निर्माण केली आहे.  भारतीय संघाचे आशास्थान म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. टीम इंडियाचा भरवशाचा व मॅच विनर खेळाडू म्हणून त्याची ख्याती सर्वात्र पसरली आहे. विराटची बॅट जर या दौऱ्याप्रसंगी तळपली तर त्याला फलंदाजीतील जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थान पटकाविण्याची संधी मिळणार  आहे.

विराट सध्या ८४६ गुण घेऊन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ए.बी. डीविलीयस हशीम अमला अनुक्रमे ८७१ व ८५१ गुण घेऊन पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. कोहली व अमला मध्ये सध्या २५ गुणाचा फरक आहे. तो या मालिकेदरम्यान मागे टाकण्याची विराटला संधी आहे. आतापर्यंत विराटने श्रीलंकेसोबत २५ सामन्यात ५२ च्या सरासरीने १०९० धावा केल्या आहेत. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरूद्ध खेळताना सलग दोन सामन्यात विराटने शतक झळकाविले आहे.