पुण्यातील रस्त्यांच्या डिझाइनमध्ये होणार बदल

पुणे दि.२० – पुण्याची वाहतूक व्यवस्था हा एखाद्याच्या पीएचडीसाठीचा विषय होऊ शकतो. मात्र, आता पुणे महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, पुणे स्ट्रीट प्रोग्राम असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्यात रस्ते, मार्ग यांचे डिझाईनच नव्याने बनविण्यात येणार आहे. रस्ते अधिक सुरक्षित, पादचार्‍यांसाठी सोयीचे, सायकलस्वारांसाठी उपयुक्त, बस, मोटारी आणि स्वयंचलिक दुचाकींसाठी सुलभ, पदविक्रेत्यांसाठी फायद्याचे आणि अपंगांसाठी बिनधोक बनविण्यासाठी हे डिझाईन करण्यात येत आहे.  हे डिझायनिंग करताना रस्ते वापरणार्‍या सर्व घटकांची मतेही विचारात घेतली जाणार आहेत. महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणेकरांसाठी `ड्रीम प्रोजेक्ट’ ठरेल असे म्हटले, तर गैर ठरू नये.

या प्रकल्पांतर्गत शहरातील सुमारे १८०० किमी लांबीचे रस्ते, मग ते मोठे रस्ते असोत, छोटे रस्ते असोत व गल्ल्या असोत विकसित करण्यात येणार आहेत. अर्थात, टप्प्या टप्प्याने हे काम केले जाणार आहे. रस्त्यांवर होत असलेली अतिक्रमणे, पदपथांची दुरावस्था, बिघडलेली सिग्नल यंत्रणा, प्रचंड वाहतूक, वाहनांची प्रंचड संख्या, पार्किंगची असुविधा, यामुळे पुण्यातील रस्ते सुधारणे हे काम अत्यंत अवघड आहे. मात्र ते अशक्य नाही असे जाणकारांचे मत आहे. त्यातून जागोजागी असणार्‍या पथारीवाल्यांनी व पदपथविक्रेत्यांनी हे रस्ते आणखी अरूंद केले आहेत. अर्थात, या सर्व बाबींची महापालिकेला आता जाणीव झाली असून, नागरी वाहतूक व्यवस्थापनाची फारच गरज असल्याचेही त्यांच्या लक्षात आले आहे. त्यासाठीच हा पुणे स्ट्रीट प्रोग्राम आखण्यात आला आहे.

रस्त्यांच्या सुधारणा करताना अपंग व्यक्ती, सायकल स्वार, बसचा वापर करणारे नागरिक यांचा मुख्यत्वे विचार केला जाईलच; पण पदपथावरच ठाण मांडून बसणारे फेरीवाले, चुकीच्या जागी वाहने उभी करणारे चालक, ऑटो रिक्षा चालक, कचरा वेचणारे, शाळा-कॉलेजेस यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या सूचनांचाही विचार केला जाणार आहे असे मनपाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रमोद निरभावणे यांनी सांगितले.