अमेरिकेकडून पाकच्या आर्थिक मदतीत कपात

वॉशिंग्टन दि.२०- पाकिस्तानला अमेरिका करत असलेल्या लष्करी आर्थिक मदतीत ६५० दशलक्ष डॉलर्सची कपात करण्याचा ठराव यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह ने आज एकमताने मंजूर केला असून, आता तो मंजुरीसाठी सिनेटकडे पाठविला जाणार आहे. कॉंग्रेसमन टेड पो यांनी हा प्रस्ताव मांडताना १.३ बिलीयन डॉलर्सची कपात केली जावी, असे आग्रही प्रतिपादन केले होते. मात्र, त्याला रिपब्लीकनांकडून विरोध झाल्याने अखेर ६५० दशलक्ष डॉलर्सवर तडजोड करण्यात आली असे सांगण्यात आले आहे.

या प्रस्तावावर भाषण करताना पो म्हणाले की, `अमेरिका आज अनेक वर्षे दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकिस्तानला करोडो डॉलर्सची मदत करते आहे. मात्र, पाकिस्तानने नेहमीच आपली फसवणूक केली आहे. पाकिस्तान अप्रामाणिक आणि फितूर असल्याने त्यांच्याकडून अमेरिकेलाच धोका निर्माण होतो आहे. आपण त्यांना दिलेल्या या प्रचंड आर्थिक मदतीतून ते अमेरिकेवरच हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना पैसा पुरवित आहेत. मात्र, आता मदतीचा हा प्रवाह बंद करायला हवा. आपण पाकिस्तानला पैसा पुरवून शत्रूलाच मदत करत आहोत आणि त्यामुळे अमेरिकनांच्या जीवाला धोका निर्माण करत आहोत.’